भुसावळ (प्रतिनिधी)-उन्हाळी सुटीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इस्कॉन आणि डॉ. रेखा पाटील यांच्या पुढाकारातून ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय मोफत उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २४ ते २६ एप्रिलदरम्यान मिरची गार्डन परिसरातील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील निर्मल गार्डन येथे दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होत आहे.

या शिबिरामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासावर विशेष भर दिला जात आहे. सुटीच्या काळात मुलांना मोबाइल आणि टीव्हीपासून दूर ठेवून त्यांना रचनात्मक उपक्रमांकडे वळवण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. भुसावळकर पालकांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष रासयात्राप्रभू व त्यांची टीम परिश्रम घेत आहे.
शिबिरातील उपक्रम
पहिला दिवस (२४ एप्रिल):
शिबिराच्या पहिल्या दिवशी बालरोग तज्ज्ञांच्या पथकाद्वारे मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हीट स्ट्रोकपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उन्हाळ्यातील योग्य आहाराबाबत माहिती देण्यात आली.
दुसरा दिवस (२५ एप्रिल):
या दिवशी मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पालकांसाठी मुलांच्या वर्तन समस्या आणि मानसिक ताण यावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यासोबतच योगा, मेडिटेशन, झुंबा व्यायाम आणि समर ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले.
तिसरा दिवस (२६ एप्रिल):
समारोपाच्या दिवशी मुलांना आध्यात्मिक संस्कार दिले जाणार असून श्लोक पठण, कीर्तन, गीता पाठ तसेच रामायण आणि महाभारतावर आधारित नाटिका सादर केल्या जाणार आहेत. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करून कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.
‘संस्कार आणि आरोग्य’ यांवर भर
“आजच्या धावपळीच्या युगात मुलांवर सुसंस्कार होणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहणे ही काळाची गरज आहे. सुटीच्या काळात मुलांना मोबाइलच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे,” असे मत डॉ. रेखा पाटील यांनी व्यक्त केले.


