नवी दिल्ली: देशाच्या बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे बँकेला कोणत्याही ग्राहकाकडून नवीन ठेवी स्वीकारणे किंवा क्रेडिट व्यवहार करणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

आरबीआयच्या या कठोर कारवाईमुळे बँकेच्या लाखो ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. नियामक संस्थेने बँकेच्या व्यवस्थापन पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्या ठेवीदारांच्या तसेच सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचे नमूद केले आहे.
या निर्णयानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील कोणताही बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, बँक बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक बंद झाल्यानंतरही ग्राहकांच्या ठेवी परत करण्यासाठी बँकेकडे पुरेशी तरलता उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, पीपीबीएलला ११ मार्च २०२२ पासून नवीन ग्राहक जोडण्यावर आधीच निर्बंध घालण्यात आले होते.
या घडामोडीमुळे देशातील डिजिटल बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात याचे व्यापक परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


