भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता थेट नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नारायण नगर परिसरात पहाटे शाळेसाठी घराबाहेर पडलेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

या हल्ल्यात तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला तब्बल ८० टाके पडले आहेत. जखमी मुलावर सध्या जळगाव येथील शिल्प हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मुलाला प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे १.५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
या घटनेमुळे मुलासह संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
वारंवार तक्रारी, मात्र कारवाई शून्य
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत यापूर्वी अनेकदा नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने कोणतीही प्रभावी उपाययोजना केली नाही. उलट शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या वाढून ते अधिक आक्रमक बनत असल्याचे दिसून येत आहे.
भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, गणेश कॉलनी आदी भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यात गणेश कॉलनीत एका वृद्धालाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष?
दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र भुसावळ नगरपरिषदेकडून त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि वाढती घाण यामुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रेबिजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका अधिक गंभीर बनला आहे.
नागरिकांनी पालिकेला दिले निवेदन
मोकाट कुत्र्याने केलेल्या या हल्ल्याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले असून यात आक्रमक मोकाट कुत्र्यांना तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे , नियमित श्वान नसबंदी मोहिमा राबवाव्यात , पाळीव प्राण्यांच्या मालकांनी लसीकरण व नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी ,
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात , आदी मागण्या केल्या आहेत.
या निवेदनावर विलास कोळी, दशरथ सपकाळे, दीपक आत्माराम सोनवणे यांच्यासह रेखा फिरके, धनश्री लढे, दीपाली शिरसागर, संगीता सरोदे, रूपाली पाटील, ललिता पाटील, निर्मला गायकवाड आणि सोनाली महिंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या गंभीर घटनेवर भुसावळ नगरपरिषदेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक तीव्र झाला असून तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.


