पुणे,

राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे 39.4 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. राज्यासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर येथे झाली असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील आठवडाभर कमाल तापमानात वाढ होत जाणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जास्त चटका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकणात मागील आठवड्यात सलग तीन दिवस उष्णतेची लाट आली होती. त्याचा फटका मुंबईसह कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना बसला होता. सध्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा कमाल तापमानाचा पारा 38 ते 39 अंशांच्या पुढे पोहचला आहे.
हवामान विभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारताकडून येणारे थंड वारे थांबले असून, दक्षिणेकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळेच राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे.


