पाळधी, (1 जानेवारी 2025) : – वाहनाला कट लागल्याच्या व हॉर्न वाजवल्याच्या वादातून पाळधी येथे दोन गट भिडले. शाब्दीक वाद गुद्यावर गेल्यानंतर जमावाने वाहनाची तोडफोड करीत पाच ते सहा दुकानांना आगी लावल्या.. ही धक्कादायक घटना सरत्या वर्षाच्या अखेरीला धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, गावातील तणावाचे वातावरण पाहता गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जमाव जमल्यानंतर दुकानांना आगी
वाहनचालकांच्या वादानंतर प्रकरण मिटले मात्र काही वेळानंतर दोन्ही गटातील लोक ग्रामपंचायत चौकात समोरासमोर आल्याने पुन्हा वाद उफाळला. यानंतर झालेल्या हाणामारीत दंगल पसरली. एका गटाने परिसरातील पाच दुकानांची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला. महामार्गावरील सर्व हॉटेल्स पोलिसांनी तत्काळ बंद केल्या. रात्री उशिरापर्यंत दंगा नियंत्रण पत्रकासह पोलिस कर्मचारी गस्त करीत होते.
अग्निशमनच्या चार बंबांनी विझविली आग
पाळधी येथील घटनेत भाजीपाला बाजाराच्या जवळील मुख्य रस्त्यावरील तीन ते चार दुकानांना आग लागली होती. धरणगाव नगरपालिकेचा बंब तसेच जळगाव महानगरपालिकेचा बंब व जैन इरिगेशन कंपनीचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. रात्री अंधार असल्याने दुकानांचे कुलूप तोडून आग विझवावी लागल्याचे सांगण्यात आले. चार अग्निशमन बंबाच्या सहा फेर्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. रात्री जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाळधीत भेट देऊन अधिकार्यांना सूचना दिल्या.


