वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीचा ११ जुलै रोजी नगरपरिषदवर महामोर्चा

  • ग्रामदैवत रेणुकामाता मंदिरापासून मोर्चाला होणार सुरूवात; गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

भुसावळ – वरणगाव येथील नगरपरिषद ही गावापासून एक की.मी.च्या अंतरावर म्हणजे रेल्वे स्टेशनजवळील विश्राम गृहाजवळ नेण्याचा घाट सुरू आहे. तसा ठराव देखील तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधिनी केला असल्याचे निदर्शनात आले आहे. याला विरोध म्हणून गावातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि समाजसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समिती स्थापन करून लढा देण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ११ जुलै मंगळवार रोजी नगरपरिषदवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीने शनिवारी सायंकाळी वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय आशिषकुमार अडसूळ यांना नगरपरिषदवर ११ जुलै रोजी महामोर्चा निघणार असल्याचे पत्र दिले आहे.

येत्या ११ जुलै मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता ग्रामदैवत रेणुका माता मंदिर भोगावती नदी पात्र येथून महामोर्चाला सुरूवात होईल. जुनी पोस्ट गल्ली, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा, गांधी चौकमार्गे नगरपरिषद येथे मुख्याधिकारी समीर शेख यांना ग्रामस्थांनी केलेल्या नगरपरिषद स्थलांतर विरोधी स्वाक्षऱ्याचे पत्र तसेच निवेदन देण्यात येणार आहे.

या महामोर्चात शहरातील महीला पुरुष, तरुण युवक, सामाजिक संघटना, गणेश मंडळे, दुर्गा मंडळे तसेच सर्व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.