भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनंतर भुसावळात पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवले, असा आरोप मंगळवारी भुसावळातील ‘प्रहार’च्या पदाधिकार्यांनी केला होता. या आरोपाचे खंडण भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी केले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेशी आमदारांचा काडीमात्र संबंध नसल्याचे तो प्रशासकीय कामाचा भाग आहे. आरोप करणारे प्रहारचे फिरोज शेख हे ‘तोडी बहाद्दर’ आहेत तर प्रकाश (खन्ना) कोळी हे दहावी नापास असताना त्यांनी पालिकेत नोकरी मिळवली व त्यांच्यावर त्याबाबत गुन्हा दाखल असून त्यांना आरोप करण्याचा नैतीक अधिकार नाही मात्र ज्यांनी आरोप केले आहेत त्यांच्या ‘बोलविता धनी’ दुसराच असल्याचे बोलत त्यांनी पडद्याआड न लपता आता समोर यावे, असे खुले आव्हान भाजपचे युवराज लोणारी व भाजपा पदाधिकार्यांनी यावेळी केले . शहरातील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी पत्रकार परीषदेचे आयोजन करून ‘प्रहार’च्या पदाधिकार्यांनी केलेल्या आरोप खोडून काढले व निषेध नोंदवला.
पत्रकार परीषदेला माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, पिंटू ठाकूर, राजेंद्र आवटे राजेंद्र नाटकर, शेखर इंगळे, निकी बत्रा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे, गिरीश महाजन, लक्ष्मण सोयंके, शहराध्यक्ष अनिता आंबेकर, बिसन गोहर, अनिरुद्ध कुलकर्णी, नारायण रणधीर, मुकुंदा निमसे, प्रशांत (लल्ला) देवकर, जिल्हा सरचिटणीस शैलजा नारखेडे, भारती वैष्णव आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री लोणारी म्हणाले की , आमदारांवर एकही डाग नसल्याने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ज्यांनी आरोप केले ते प्रहारचे फिरोज शेख हे तोडी बहाद्दर आहेत, त्यांनी मागील पालिका निवडणुकीत क़ाय क़ाय केले व कुणाकडून काय-काय घेतले याचा आम्ही लवकरच भंडाफोड करू, असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी केला तर प्रकाश (खन्ना) कोळी हे पालिकेचे माजी कर्मचारी असून ते दहावी नापास असूनही त्यांनी नोकरी मिळवल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे त्यांची चौकशी सुरू आहे म्हणून त्यांना आरोप करण्याचा नैतीक अधिकार नसल्याचे लोणारी म्हणाले. तसेच रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवत असताना शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरू असताना प्रहार संघटनेचे पदाधिकारी बिळात का लपले ? असा परखड सवाल माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी उपस्थित केला. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे आरोप केले जात असून या आरोपाचे खंडण करण्यासाठीच पत्रकार परीषद घेण्यात आल्याचे ते म्हणाले. रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्यांसाठी पाच हजार घरकुलांचा प्रस्ताव आमदारांनी पाठवला असून लवकरच त्यांना घरकुले मिळणार असल्याचे लोणारी म्हणाले मूळात आमदारांकडे काही लोकांनी मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी मुद्दा मांडला मात्र पालिकेवर ‘प्रशासक राज’ असल्याने केव्हा, कधी व कुठून कशी मोहिम राबवावी हा पालिकेच्या अधिकार्यांच्या कामाचा भाग आहे त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या बाबीशी आमदारांचा काडीमात्र संबंध नाही, असेही लोणारीनी याबी स्पष्ट केले.
अतिक्रमण मोहिमेबाबत जे कार्यकर्त्यांकडून आरोप करवून घेत आहेत ‘त्या’ पदाधिकार्यांच्या नेत्यांनीच शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचा आरोप लोणारी यांनी केला. ते म्हणाले की, मुद्रा लोणचे पैसे खाल्ले कुणी? कुणाच्या खात्यात हा धनादेश वटला, तो युवा नेता कोण? भुसावळातील खरा खंडणीखोर कोण? हे पुराव्यानिशी आगामी काळात सिद्ध करू, असेही लोणारी म्हणाले.

येत्या पालिका निवडणुका लक्षात घेवून विनाकारण आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे यांनी सांगीतले पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असून या काळातही अतिक्रमण हटवण्यात आले आहे त्यामुळे सत्ता असताना कुणीही त्याबाबत ओरडही केलेली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तेच अतिक्रमण हटवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


