फैजपूर – ज्याने पाप केले त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. पापाचे प्रायश्चित्त कळल्याशिवाय पाप थांबत नाही. त्यामुळे अशी कर्मे करावी की, त्याची फळे भोगतांना पश्चाताप होणार नाही. यासाठी आपल्या आयुष्यात सत्कर्माचा प्रभाव वाढवावा. कारण सत्कर्माचा प्रभाव वाढल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होत नाही, असे प्रतिपादन महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

चिनावल, ता. रावेर येथील नियोजित श्री सतपंथ मंदिरात मासिक प्रवचनमालेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी गुरू इमामशाह महाराज व गुरू जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. श्रीकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधतांना महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज प्रवचनात म्हणाले की, नुकतीच महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी झाली. त्यांचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे. वाल्मिकींना जेव्हा आपल्या पापाचे प्रायचित्त कळले तेव्हा त्यांचे पाप करणे थांबले. आपण दोषमुक्त जे स्वीकारतो ते पाप होते. मरणासन्न अवस्थेत असताना जीवनातील आपल्या चुका समोर येतात. त्यामुळे जीवन जगत असताना आपण श्रद्धायुक्त भक्तीने जीवन जगावे. शेवटी वासना जर जेवणाची तर असेल तर आपण जीवन जगलोच नाही असे समजावे. या कलियुगात तरून जाण्यासाठी नामस्मरण हा मार्ग सर्वोत्तम सांगितलेला आहे. नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात. हे नामस्मरण श्रद्धायुक्त भक्तीने करावे. सत्संगात जाताना विवेक असावा. मंदिरात जाताना अहंकार व अभिमानाची पादत्राणे बाहेर काढावी. कारण मंदिरात भेद संपूर्णपणे संपलेला असतो आणि सर्व आत्मभावाने एकत्रित आलेले असतात. मानवी स्वभाव हा असंतुष्ट आहे. परंतु तरी सुद्धा जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. जीवनात येणाऱ्या सुख-दु:खाने विचलित होऊ नये. विश्वासाने त्याला सामोरे जावे. साधनेमुळे मनाची स्थिरता प्राप्त होते. ही साधना कशी केली पाहिजे यासाठी गुरूंना भेटावे. गुरूंशी चर्चा करावी. प्रापंचिक समस्यांपेक्षा अध्यात्मिक समस्या गुरूंना विचाराव्या. तेव्हाच गुरू आपल्यातील दोषरूपी अंध:कार दूर करून आपल्यामध्ये श्रद्धारूपी ज्योत प्रज्वलित करतील. हे करत असताना गुरूंवरील श्रद्धा ढळू द्यायची नाही. हीच आपली अग्निपरीक्षा असते. सोने तापवल्यास सोने अधिक उजळून निघते. आपल्या पुण्याचा उदय झाल्यास भक्तीची सुरूवात होते. गुरू इमामशाह महाराज यांची जन्मोजन्मीची साधना होती. या आधीच्या जन्मात ते भद्र पुजारी होते. त्यांच्यात बारा कला होत्या. त्यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अध्यात्माचा प्रचार व प्रसार केला. गुरूदेव जगन्नाथ महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर पायपीट करून सतपंथाचा प्रचार व प्रसार केला आणि समाजामध्ये जागृती करण्याचे काम केले. त्यांच्या वाटेने चालत असताना इतर पंथांशी जुळवून घेत त्यांच्याशी सुसंवाद साधणे आणि कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न बाळगता एकत्रित येणे यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही महामंडलेश्वर आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले. त्यांच्यासोबत भुसावळ येथून डॉ. जगदीश पाटील व फैजपूर येथूून प्रा. उमाकांत पाटील उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त एक दिवस आधी वरणगाव फॅक्टरीत पार पडलेल्या प्रवचनाचा विषय त्यांनी पुढे घेऊन जात चिनावल येथे आपल्या प्रवचनाला सुरूवात केली. स्थळ बदलले तरी कथा जिथे संपली तिथून पुढील प्रवचनात कथा सुरू करण्याचे वेगळेपण महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रवचनात ऐकायला व पाहायला मिळाले.
ग्लोबल सतपंथाच्या दिशेने वाटचाल – सर्वधर्मसमभावासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी धर्म संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सतपंथाची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम सतपंथ गादीपती या नात्याने मी प्रामाणिकपणे करत आहे. सतपंथ हा फक्त गाव व राज्यापुरताच मर्यादित न ठेवता ग्लोबल सतपंथ करण्याची देखील मनस्वी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. चिनावल येथील नियोजित भव्यदिव्य सतपंथ मंदिरात दर महिन्याला महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.


