भुसावळ (प्रतिनिधी )-
गरीब जनतेचे घरगुती ३ महिन्याचे विजबील माफ करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी व हे संकट हद्दपार करण्यासाठी संपुर्ण देशभरात लॉकडाऊन आहे .या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत . आपल्याकडे असलेल्या ऊर्जा खात्यांतर्गत लॉक डाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांच्या विजबिलातील स्थिर आकार पुढील 3 महिन्यासाठी स्थगित करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्रातील गरीब जनतेला 100 युनिट पर्यंत मोफत विजय देण्याची योजना आपण आखली होती. परंतु काही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे ती तात्काळ लागू होऊ शकली नाही. भविष्यात आपण या योजनेची अंमलबजावणी राज्यात कराल या बद्दल तिळमात्र शंका नाही.
महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी,आज हातावर पोट असलेल्या गोर गरीब सामान्य माणसांच्या समोर प्रचंड आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहे. दररोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची ताकद सुद्धा सर्वसामान्य माणसाजवळ राहली नसून अशा परिस्थितीमध्ये लोकडाऊनच्या कालावधीतील घरघुती विज बिल भरणे त्यांना अशक्य आहे. त्यामुळे ,लॉक डाऊन कालावधीत 3 महिन्याचे संपुर्ण घरगुती विजबिल माफ करून राज्यातील गरीब जनतेस दिलासा दयावा अशी मागणी उर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांच्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.



