जळगाव दि. 1 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. १३ मार्च पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपनी व तत्सम आस्थापना दिनांक ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले होते.
शासनाने 14 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (लॉक डाऊन) लागु करण्यात आली असल्याने यामधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळून इतर सर्व कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याबाबतचे आदेश दिनांक 15 एप्रिल, 2020 च्या रात्री 1 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.



