भुसावळ (प्रतिनिधी )-
सामूहिक आत्महत्या स्मृतीदिना निमित्त भुसावळसह वेल्हाळेत अन्नत्याग आंदोलन गुरुवार १९ मार्च रोजी करण्यात आले.
१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांनी पहिली सामूहिक आत्महत्या केली होती. या गोष्टीला ३४ वर्षे होत असल्याने या सामूहिक आत्महत्येचा स्मृतीदिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, देश व विदेशात एक दिवस १९ मार्च रोजी उपवास केला जातो. सध्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सतत वाढ होत असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे. अन्नदाता संकटात सापडला असून त्याच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक संवेदनशील नागरीकाचे कर्तव्य आहे. १९ मार्च रोजी आत्महत्या केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना स्मरुन शेतकरी स्वातंत्र्यासाठी व शेतकर्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी येथील लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी अन्नत्याग करून उपवास धरत शेतकरी बांधवांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, वेल्हाळे येथे ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम पाटील, हेमा पाटील, राजू राणे व अन्य ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले.



