तामिळनाडूतील बौद्ध अवशेषांची राजधानी – कांचीपुरम

     जगातील सर्वात प्राचीन व समृद्ध संस्कृती म्हणून जे काही  प्रदेश आहेत त्यातील एक प्रदेश म्हणून तामिळनाडू आहे . या प्रदेशात ई. स. पूर्व १५०० मधील मानविवस्तीचे अवशेष आढळून आले आहे. हा प्रदेश तसा आधीपासूनच भक्ती मार्गाचा अवलंब करणारा आहे . या प्रदेशात बौद्ध धर्म तसा आधीपासूनच कमी प्रमाणात राहिलेला आहे .या प्रदेशात बौद्ध धर्माचा पाया सम्राट अशोक यांनी घातला आहे . कांचीपुरम येथे सम्राट अशोक यांनी एक भव्य बौद्ध स्तूप बांधला आहे , त्याचे अवशेष आजही उपलब्ध आहेत . तामिळनाडू मध्ये आजपर्यंत एकही बौद्ध राजा झालेला नाही मात्र पल्लव व चोल राजांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिलेला आहे . पल्लवांची सत्ता जेंव्हा ई. स. २७५ ला स्थापन झाली तेंव्हा त्यांनी कांचीपुरमला राजधानी बनविली होती .
             ***  राजपुत्र महेंद्र यांचे कार्य ****
     सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र यांनी सिलोन येथे जाण्याच्या आधी तामिळनाडू मधील कांचीपुरम मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार केलेला आहे . महेंद्र यांनी मदुराई जवळ एक बौद्ध स्तूप उभारला आहे . महेंद्र यांच्या कार्याचे वर्णन चिनी प्रवासी ह्यू यान स्यांग  , पंडित हिसेले धर्मरत्न महाथेरो , बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रा. डॉ. शु. हिकोसाके यांनी आपापल्या ग्रंथात केलेला आहे . महेंद्र काही दिवस कांचीपुरम येथे मुक्कामी राहिले व इथूनच पुढं सिलोनला गेले व तिथंच  त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार करून संपूर्ण सिलोन देश बुद्धमय बनविला . 
    इ. स. पूर्व ३ रे शतक मध्ये इथं काही प्रमाणात बौद्ध धर्माचे कार्य झाल्या नंतर सुमारे ७०० वर्षांनी  ई.स. ४ थे शतक मध्येच बौद्ध धर्माचे काम सुरू झाले . हे काम ई. स. ६५० पर्यंत चालू राहिले ,  ३०० वर्षात कांचीपुरम , नागपट्टीनम , कावेरी पट्टीनम , उरियुर ही गावं बौद्धांची मुख्य केंद्र झाली .  ह्यूयान स्यंग या चिनी प्रवाशाने ई. स. ७ वे शतक मध्ये कांचीपुरमला भेट दिली तेंव्हा त्याला तिथं शेकडो बुद्ध विहारं  , दहा हजार  बौद्ध भिक्खू  असल्याचे , सम्राट अशोक यांनी उभारलेल्या १०० फूट उंचीचा स्तुप   तसेच कांचीपुरम मधील सर्व जनता बौद्ध असल्याचे दिसून आले . या संबंधीचे विस्तृत वर्णन त्याने आपल्या प्रवास वर्णनात केलेले आहे  . 
            ***** कांचीपुरमचे वैशिष्ट ****
       कांचीपुरम हे शहर ई. स. पूर्व २ रे , ३ रे शतक मध्ये वसले आहे . ( कदाचित सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ या शहराची निर्मिती केली असावी असा तर्क लावता येतो . ) कांची आणि पुरम या दोन  तामिळ शब्दांनी मिळून हा एक शब्द झाला असून त्याचा अर्थ फुलांचे शहर असा होतो . कांचीपुरमचे आता प्रामुख्याने दोन भाग आहेत . १) शिव कांचीपुरम २) विष्णू कांचीपुरम  तसा इथं जिना कांचीपुरम म्हणून एक भाग आहे  व या भागात जैन धर्मियांची मंदिरं अधिक आहेत . शिव कांचीपुरम व विष्णू कांचीपुरम येथे सर्वत्र प्राचीन बुद्ध विहारं , भगवान बुध्द तसेच बोधिसत्व यांच्या प्राचीन मुर्त्या आहेत . कांची येथील कामाक्षी मंदिरात  भगवान बुद्ध यांची मूर्ती होती . ही मूर्ती या मंदिरातून हटवून चेन्नई येथील वास्तुसंग्रहालायात ठेवण्यात आली आहे . कांचीपुरम येथे  भगवान बुध्द यांच्या  सर्वात प्राचीन मुर्त्या  ५ व्या शतकातील आहेत . त्यातील एक मूर्ती ८ फूट उंच उभी आहे मात्र ती चेन्नई येथील वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे .  दुसरी  एक मूर्ती  कामाक्षी मंदिर जवळ असलेल्या सुब्बाराव मुदलियार उच्य माध्यमिक शाळेत ठेवण्यात आली आहे . ही मूर्ती ५ फूट ६ इंच उंचीची बैठी मूर्ती आहे . अम्मान मंदिरात सुद्धा काही बुद्ध मुर्त्या संग्रही ठेवलेल्या आहेत .  कामाक्षी मंदिर परिसरात केलेल्या उत्खननात मिळून आलेली एक बुद्ध मूर्ती  तामिळनाडूचे तत्कालीन डी.जी. पी. वॉल्टर देवारम यांना एवढी आवडली की त्यांनी स्वतः  तिथल्या पोलिस ठाण्यात असलेल्या एका जागी ठेवून घेतली . ती मूर्ती आजही तिथं आहे . कांचीपुरम लगत असलेल्या पुल्लुर येथे सुमारे १२५ वर्षाआधी केलेल्या उत्खननात भगवान बुध्द यांच्या ३ मुर्त्या मिळाल्या . १९९९ मध्ये या गावी एक बुद्ध विहार बांधण्यात आले त्या बुद्ध विहारात त्या तीनही मुर्त्या ठेवण्यात आल्या आहेत . सर्व संग्रहित मुर्त्या बघितल्या तर यातील काही मुर्त्या १२०० वर्षां नंतरही अतिशय चांगल्या अवस्थेत असल्याच्या दिसतात .
      बिहार येथील बोधगया लगत केलेल्या उत्खननात अनेक बुद्ध मुर्त्या मिळाल्या आहेत . एक शिलालेख सुद्धा त्यात आढळून आला आहे . या शिलालेखावर कांचीपुरम येथील जनतेने दान केलेल्या बुद्ध मुर्त्यांची माहिती देण्यात आली आहे . युरोपियन प्रवासी मार्को पोलो याने  सन १२९२ ला कांचीपुरम जवळील समुद्र किनाऱ्याला भेट दिली तेंव्हा त्याला तिथं ७ चैत्यगृह / पॅगोडे असल्याचे दिसून आले . त्या संबंधीचे वर्णन  त्याने '  मार्को पोलो याचा प्रवास ' या ग्रंथात केलेले आहे . १४ व्या शतकात  जावा येथून आलेल्या एका प्रवाशाने कांचीपुरम येथील १३ बौद्ध मठांचे वर्णन केले आहे . याच कांचीपुरम येथील ध्यानभद्र हे बौद्ध भिख्खू बौद्ध धर्माच्या प्रचारा करिता सन १३७० मध्ये दक्षिण कोरिया येथे गेले . त्यांनी तिथं स्वतःचा स्वतंत्र आश्रम सुरू केला . तिथं जेंव्हा उत्खनन झाले तेंव्हा बौद्ध भिक्खू ध्यानभद्र यांचे विषयी माहिती असलेला एक शिलालेख मिळाला आहे .
  तामिळनाडूतील  प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. टी. ए. गोपीनाथ राव यांनी त्यांच्या  ' एलिमेंट्स ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी '  या ग्रंथात कांचीपुरम येथील कामाक्षी मंदिर हे मूलतः  बौद्ध धर्मातील वज्रयानी तारा देवी चे मंदिर ( बुद्ध विहार )  आहे हे सप्रमाण सिध्द केले आहे . त्यांनी असेही सांगितले आहे की , कामाक्षी मंदिर परिसरात जमिनी खाली अजून दोन बुद्ध मूर्ती असून त्याचे उत्खनन होणे बाकी आहे . त्यांच्या संशोधनाने बऱ्याच ठिकाणी उत्खनन करणे  सरकारला सोपे झाले . 
     **** कांचीपुरम मधील महनीय व्यक्ती ****
     कांचीपुरम मध्ये बौद्ध धर्म , बौद्ध शिल्पकला , बौद्ध स्थापत्यकला यांचा जसा विकास झाला आहे तसाच या शहरात अनेक नामवंत बौद्ध  साहित्यिक , शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , कलाकार  , विविध क्षेत्रातील अत्यंत महनीय व्यक्ती सुद्धा जन्माला आलेले आहेत .
    आचार्य आर्यदेव ...... यांचा जन्म ई. स. ३ रे शतक मध्ये झाला . बालवयातच बौद्ध भिक्खू होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा तामिळनाडू तसेच सिलोन मध्ये प्रचार केला . ते नालंदा विद्यापीठात प्रमुख पंडित म्हणून कार्यरत होते . त्यांनी १०० पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली असून त्यात कविता , नाटक , प्रवास वर्णन , बौद्ध धर्मातील विविध सुत्त आदींचा सहभाग आहे. त्यांना बौद्ध धर्मातील ' महायान ' पंथाचे जनक म्हणून संबोधले जाते.  सिलोन मध्ये महेंद्र , संघमित्रा यांच्यानंतर सर्वाधिक कार्य आर्यदेव यांनी केले आहे . बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ केलेल्या अथक कार्यामुळे त्यांना सिलोन मध्ये ' बोधिसत्व ' म्हणून ओळखले जाते. 
    
   पल्लव राजाचा ३ रा मुलगा बोधिधर्म पल्लव याचा जन्म ई. एस. ४४० ला झाला . याने राजवस्त्र फेकून देऊन बौद्ध भिक्खूची वस्त्रे परिधान केली . यांनी बौद्ध धर्माचा प्रचार तर केलाच केला , पण बौद्ध भिक्खू यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून काही व्यायाम , ध्यान पद्धति विकसित केल्या . त्यांनी  ' कुंग - फु ' ही मास्टर आर्ट निर्माण केली . कूंग फू या मास्टर आर्ट चे ते जनक ठरले . ई. स. ५२० मध्ये ते बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ चीन मध्ये गेले . तिथं त्यांनी  ६ बौद्ध ग्रंथ ( ज्यात एक नाटक आहे ) लिहिली .
   आचार्य दिगनाग  यांचा जन्म ई. स. ४८० मध्ये झाला . त्यांनी नालंदा विद्यापिठात शिक्षण घेतले . त्यांना  ' भारतीय न्यायशास्त्राचे जनक  ' म्हणून ओळखले जाते . ते महान तर्क शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात . तर्कशास्त्र , न्याय शास्त्र या विषयांवर त्यांनी खूप पुस्तकं लिहिली असून त्या काळी भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये त्यांची काही पुस्तकं अभ्यासक्रमास होती . त्यांनी बालवयातच नागदत्त नामक बौद्ध भिक्खू कडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती व वयाच्या १५ -१६ वर्षाचे असतानाच ते बौद्ध भिक्खू झाले . 
    धर्मकिर्ती यांचा जन्म सातव्या शतकात झालेला आहे .  बौद्ध भिक्खू दिगनाग यांना ते आपले गुरू मानत . त्यांनी बौद्ध धर्मावर सात ग्रंथ लिहिली आहेत.  दिगनाग यांच्या तर्कशास्त्र तत्वांना त्यांनी अधिक विकसित केले . त्यांनी कांचीपुरम येथे बौद्ध धर्मीय शिक्षणाचे केंद्र सुरू केले . त्यांच्या या शिक्षण केंद्राला बौद्ध धर्माच्या प्रगत शिक्षणाचे जागतिक शिक्षण केंद्र म्हणून ओळख मिळाली होती . त्यांनी नालंदा विद्यापिठात शिक्षण घेतले व शिक्षण सुरू असतानाच बौद्ध भिक्खू झाले . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या शहरात शिक्षणाचे मोठे कार्य व बौद्ध धर्माचा प्रचार केला . 
           **** आताची दयनीय अवस्था *****
     तामिळनाडूतील प्राचीन बौद्ध स्थळं खूप कमी असली तरी बहुतांश स्थळं  व एकूण कार्य आपणास कांचीपुरम मध्येच दिसतात  . एके काळी बौद्ध स्थळांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहरात आता बौद्ध धर्माचे काम मात्र शून्यवत आहे . अनेक प्राचीन मुर्त्या एकतर इतरत्र हलविण्यात आल्या आहेत तर काही मुर्त्या चोरीस गेलेल्या आहेत .  काही बौद्ध स्थळांवर अन्य धर्मीय मंदिरं बांधली गेली ,  एकेकाळी जागतिक कीर्तीचे बौद्ध शिक्षण केंद्र असलेल्या या शहरात आता बौद्ध शिक्षण पूर्णतः बंद आहे . एकेकाळी तिथली सर्वच जनता बौद्ध होती मात्र आता या शहरात बौद्ध लोक अगदी नाममात्र आहेत . २०११ च्या जनगणने नुसार या शहरात फक्त १६ लोक बौद्ध धर्मीय  होते . आज या शहरातून बौद्ध धर्माची ओळख पुसली गेली  असे मोठ्या खेदाने म्हणावेसे वाटते .
लेखक ..... जयसिंग वाघ 
अजिंठा हाउसिंग सोसायटी, अजिंठा चौक , जळगाव 
संपर्क ...... ९८८१९२८८८१