यावल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे तरुण व तडफदार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवार (दि. ४ जून) रोजी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम आदिवासी भागाला भेट देत महसूल पथकासह रात्र मुक्काम केला. या दौऱ्यात त्यांनी आदिवासी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी भवर, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेर तहसीलदार दिपा जेधे, जामन्या वनक्षेत्रपाल दुसाने, एपीओ, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी जामन्या, गाडऱ्या, उसमळी आणि लंगडाआंबा या गावांना भेट दिली.
दि. ४ जून रोजी रात्री जामन्या येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामस्थांसोबत आयोजित बैठकीत रेशन दुकानांची व्यवस्था, आरोग्य उपकेंद्राची स्थिती, पाल-माथन व वाघझिरा-लंगडाआंबा रस्त्यांचे अपूर्ण काम, वाहतूक सुविधेचा अभाव, शेतशिवार रस्ते, रोजगार हमी योजना, CFR अंतर्गत कामे, सिंचन, कृषी योजना, घरकुल, कुसुम सौर योजना, बांबू लागवड व बांबू उद्योग, डिंक व चारोळी प्रक्रिया उद्योग यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांनी परिसरासाठी मिनी बस सेवा, आपले सरकार सेवा केंद्र, प्रलंबित घरकुल प्रस्ताव मंजूर करणे, बांबू उद्योगासाठी प्रशिक्षण व चंद्रपूर अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चारही गावांसाठी एकत्रित सेवा केंद्र उभारणे, संपूर्ण गाव सौरऊर्जायुक्त करण्याचा प्रयत्न करणे, रस्ते व आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र, स्वस्त धान्य दुकान, आश्रमशाळा तसेच पाझर तलाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लंगडाआंबा येथील विश्रामगृह परिसरात आदिवासी बांधव, महसूल व वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सीताफळासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वन विभागाच्या वृक्षलागवड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
दौऱ्यादरम्यान लंगडाआंबा, उसमळी व जामन्या येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचीही प्रत्यक्ष पाहणी करून नेटवर्क सुविधेची चाचणी घेण्यात आली. या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी एक ते दीड महिन्यानंतर पुन्हा या परिसराला भेट देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामस्थांना दिले.
सातपुड्याच्या दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला हा प्रत्यक्ष मुक्काम आणि संवाद ग्रामस्थांसाठी आश्वासक ठरला असून प्रशासन त्यांच्या दारी पोहोचल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


