जळगावात उष्म्याचा कहर; दोन जणांचा संशयित उष्माघाताने मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी )- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता जीवघेणा ठरत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत माहिती देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज आहे. मात्र अधिकृत निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

पहिली घटना जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे घडली. ५७ वर्षीय केशरलाल दौलत पाटील हे सेंट्रिंगचे काम करत असताना दुपारच्या कडक उन्हात अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसरी घटना जळगाव शहरातील चित्रा चौक परिसरात घडली. ३६ वर्षीय प्रवीण दत्तू मिस्तरी हा तरुण रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशांच्या आसपास कायम असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.