जळगावात कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव (प्रतिनिधी ) : शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. रेल्वे पुलाजवळ आणि नवीन तिकीट घर परिसरात झालेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११.४० वाजता शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला माहिती दिली की, भुसावळकडून येणाऱ्या कोळसा मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीतून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून येत आहेत.

माहिती मिळताच शिवाजीनगर अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक किरण महाजन तसेच फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तत्परतेने आग विझविण्याचे काम हाती घेतले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

घटना शिवाजीनगर रेल्वे पुल परिसरात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, कोळशामधील उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.