नाशिक | दि. ११ जानेवारी २०२६

नाशिकमध्ये भाजपच्या राजकारणाने आता हास्यास्पद आणि धक्कादायक वळण घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या ‘कमळ’ चिन्हाच्या जोरावर भाजप सत्तेची स्वप्ने पाहतो, त्याच कमळाला मतदान करू नका, असे आवाहन करण्याची वेळ भाजपवर आली आहे. पक्षांतर्गत गटबाजी, स्वार्थी राजकारण आणि एबी फॉर्मवरील अक्षम्य गोंधळामुळे भाजपची पोलखोल उघडपणे मतदारांसमोर झाली आहे.
एबी फॉर्मचा घोळ, भाजपची नाचक्की
सिडको भागात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी झालेल्या एबी फॉर्मच्या गोंधळामुळे भाजपचे एक नव्हे, तर तब्बल तीन उमेदवार अधिकृतरीत्या रिंगणात उतरले. नंतर दोन उमेदवारांनी माघार घेतली, मात्र अलका अहिरे यांनी झुकण्यास नकार देत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. संतप्त झालेल्या भाजपने त्यांना आणि त्यांचे पती कैलास अहिरे यांना पक्षातून हाकलून दिले.
मात्र, सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे— पक्षातून हकालपट्टी झाली तरी कमळ चिन्ह मात्र त्यांच्या नावावर कायम आहे!
भाजपची दुहेरी भूमिका, जनतेची फसवणूक?
एका बाजूला भाजप अलका अहिरे यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या ठरवतो, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच नावावर भाजपचे अधिकृत चिन्ह आहे. त्यामुळे “कमळावर पडलेले मत भाजपचे नाही,” असा अजब दावा आता खुद्द भाजपचेच नेते करत आहेत. हा राजकीय गोंधळ नसून जनतेची थेट फसवणूक आहे, अशी टीका होत आहे.
कमळ नको, बंडखोर चालतो?
“चिन्ह महत्त्वाचे नाही, उमेदवार महत्त्वाचा,” असे सांगत भाजपचा नाराज गट आता कमळाऐवजी अपक्ष किंवा बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात उतरला आहे. काही भागांत भाजपचे कार्यकर्तेच कमळाविरोधात उघड प्रचार करताना दिसत आहेत. शिस्तीच्या नावाने इतरांना धडे देणाऱ्या भाजपमध्ये ही उघड बंडाळी पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
मतदारांचा सवाल – भाजपवर विश्वास ठेवायचा तरी कसा?
नेहमी संघटित आणि शिस्तबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्येच जर स्वतःच्या चिन्हावरून यादवी सुरू असेल, तर मतदारांनी नेमके कोणावर विश्वास ठेवायचा? राष्ट्रीय पातळीवर ‘कमळ’ हे भाजपचे बळ मानले जाते, पण नाशकात त्याच कमळाला नाकारले जात असल्याने भाजपची अंतर्गत विस्कळीत अवस्था चव्हाट्यावर आली आहे.
नाशिकमधील ही घटना केवळ स्थानिक वाद न राहता, भाजपच्या संघटनात्मक अपयशाचे आणि अंतर्गत गटबाजीच्या कडेलोटाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.


