भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यावरण सागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी नागरिकांना बोधी वृक्षासह इतर उपयुक्त झाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

डॉ. आंबेडकरांनी 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म स्वीकारत समानता, प्रज्ञा, करुणा आणि समतेचा मार्ग स्वीकारला. बुद्ध, कबीर व महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसतो. सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि मानवतावादी मूल्ये जीवनभर त्यांनी जपली. जगातील सर्वांत मोठी भारतीय राज्यघटना त्यांनी दिली, जी प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची हमी देते.
बोधगया येथील पिंपळाचे बोधी वृक्ष हे ज्ञानप्राप्तीचे प्रतीक असून बौद्ध संस्कृतीत ते पवित्र मानले जाते. याच वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले होते. पिंपळाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणारे असून पर्यावरणीय संतुलनात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. रहिवासी भागात पिंपळाच्या झाडांची संख्या कमी झाल्याने पक्ष्यांचे, विशेषतः कावळ्यांचे नैसर्गिक वास्तव्यही कमी होत चालले आहे.
आज वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन पिंपळासह पर्यावरणास उपयुक्त झाडांची लागवड व संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालये, ओपन स्पेस, सार्वजनिक रस्ते आणि उपयुक्त जागांमध्ये कोणालाही त्रास न होईल अशा पद्धतीने वृक्षारोपण करावे, असे त्यांनी आवाहन केले.
महापरिनिर्वाण दिन हे फक्त स्मरण नाही, तर जबाबदारीची जाणीव देणारा दिवस असल्याचे सांगत, “जातिभेद नष्ट करून पर्यावरणाचे रक्षण करणे हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली,” असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
— डॉ. सुरेंद्रसिंग पाटील
संचालक, पर्यावरण सागर प्रतिष्ठान


