उत्तर कार्याच्या निमित्ताने स्मृतिपित्यर्थ हृदयस्पर्शी वृक्षारोपण ;


जळगाव (प्रतिनिधी ) – लाडली ता धरणगाव या
गावामध्ये आज सोमवार रोजी उत्तर कार्याच्या निमित्ताने आयोजित केलेला वृक्षारोपण सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. दिवंगत प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने मातीच्या कुशीत प्रेमाने रोपे रुजवली. प्रत्येक रोपासोबत एखादी आठवण, एक भावना आणि एक मौल्यवान नात्याची जपणूक जणू जमिनीत सामावली गेली. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्य विभावरी पाटील यांच्या सासू तसेच मुख्याध्यापक राधेश्याम पाटील यांच्या आई कैलासवासी वत्सलाबाई पाटील यांच्या उत्तर कार्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रमास कुटुंबातील सदस्य ., नातेवाईक, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोपे लावताना अनेकांच्या डोळ्यांत पाण्याची काजळी दाटून आली. “आपले गेलेले व्यक्ती परत येऊ शकत नाहीत; पण त्यांच्या स्मरणार्थ लावलेले हे वृक्ष आपल्याला कायम त्यांच्या सान्निध्याची जाणीव करून देतील,” असे उपस्थितांनी सांगितले.

गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, स्मृतींच्या या रोपांमुळे केवळ पर्यावरण नाही तर मानवतेची नातीही कायम हिरवीगार राहतील. रोपांची नियमित देखभाल व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकरित्या केली.

दिवंगत व्यक्तींच्या आठवणींना जपणारा हा हरित उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या स्मृती पुढील अनेक वर्षे या वृक्षांच्या रूपाने जिवंत राहणार आहेत.
यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनीषा पाटील, विभावरी पाटील, राधेश्याम पाटील ,सचिव श्रीमती ज्योती राणे ,हर्षा गुजराती, रेणुका हिंगू,किमया पाटील आशा मौर्य ,तेजल वनरा, शारदा पाटील, ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित होते