भुसावळ (प्रतिनिधी ) – संविधान सन्मान संमेलन संयाेजन समितीतर्फे जळगावात २९ व ३० नाेव्हेंबर असे दाेन दिवसीय राज्यस्तरीय संविधान संमेलन आयाेजित करण्यात आले आहे. रिंगराेडवर असलेल्या यशाेदया हाॅल येथे हे संमेलन हाेईल. त्यात संविधानाचे महत्त्व, आव्हाने, सामाजिक स्थिती, महिलांचे याेगदान अशा विविध विषयावर चार सत्रात तज्ज्ञ आपली मते मांडणार आहेत.
शहरातील कांताई सभागृहात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य संयाेजक मुकुंद सपकाळे यांनी ही माहिती दिली. संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, उद्घाटक जयपूर येथील गीतकार, हिंदी साहित्यिक संपत सरल असतील. समाराेप सत्राला माजी न्यायमूर्ती तथा संविधान जागर अभियानाचे राष्ट्रीय संयाेजक बी. जी. काेळसे-पाटील प्रमुख अतिथी असतील. संमेलनात जागतिक किर्तीचे चित्रकार श्रीधर अंभाेरे यांची प्रकट मुलाखत, चार परिसंवाद, एक कवी संमेलन, प्रबाेधनकार भाऊसाहेब थुटे यांचे किर्तन हाेईल. संविधान विषयावर केलेल्या शाेधनिबंधाचे वाचनही केले जाईल. संमेलनाला राज्यभरातून २५० प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि जिल्हाभरातून १५०० संविधानप्रेमी उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात आले. स्वागताध्यक्ष डाॅ. अब्दुल करीम सालार हे आहेत. या पत्रकार परिषदेला साहित्यिक जयसिंग वाघ, डाॅ. मिलिद बागूल, डाॅ. सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील, अॅड. आकाश सपकाळे व संयाेजन समितीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

पहिल्या दिवशी दाेन परिसंवाद
-संमेलनाचे उद्घाटन २९ नाेव्हेंबर राेजी सकाळी १०.३० वाजता हाेईल. दुपारी १२ वाजता ‘भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी’ या विषयावर पहिला परिसंवाद हाेईल. अध्यक्ष बुलढाणा येथील सुरेश साबळे असतील. प्रा. डाॅ. लहू वाघमारे (लातूर), माेहन शिरसाठ (वाशिम), प्रा. डाॅ. लिलाधर पाटील (अमळनेर), डाॅ. अ. फ. भालेराव (मुक्ताईगर), कैलास वानखेडे (अकाेला) हे सहभागी हाेतील.
- दुसरा परिसंवाद दुपारी २ वाजता ‘भारतीय संविधान समाेरील आव्हाने’ या विषयावर आहे. बेळगावचे प्रा. डाॅ. संजय कांबळे अध्यक्षस्थानी असतील. प्रा. डाॅ. अशाेक इंगळे (अकाेला), जयसिंग वाघ (जळगाव), प्रा. डाॅ. माराेती कसाब (उदगीर), प्रा. डाॅ. सत्यजीत साळवे (जळगाव), प्रा. डाॅ. राहुल निकम (चाळीसगाव), पंजाबराव गायकवाड (बुलढाणा) हे सहभागी हाेणार आहेत.
- सायंकाळी ५ वाजता कवी संमेलन हाेईल. अध्यक्षस्थानी अजीम नवाज राही असतील. सूत्रसंचालन डाॅ. मिलिंद बागूल करतील. राज्यभरातील कवी सहभागी हाेतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता भाऊसाहेब थुटे यांचे किर्तन हाेईल.
दुसऱ्या दिवशी असे हाेणार कार्यक्रम
- संमेलनात ३० राेजी सकाळी ९.३० वाजता ‘सद्यस्थितीत भारतीय संविधानाची वाटचाल आणि सामाजिक स्थिती’ या विषयावर तिसरा परिसंवाद हाेईल. अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे प्रा. डाॅ. इसादास भडके असतील. प्रा. रंगनाथ धांडे (वाशिम), प्रा. सुधीर अनवले (लातूर), प्रा. भास्कर पाटील (अकाेला), प्रा. डाॅ. रवींद्र मुरमाडे (चंद्रपूर), डाॅ. संजीवकमुमार साेनवणे (धरणगाव), प्रा. डाॅ. अनिल हिवाळे (भुसावळ), प्रा. भरत शिरसाठ (एरंडाेल) हे सहभागी हाेतील.
- सकाळी १०.३० वाजता ‘संविधान निर्मितीत महिलांचे याेगदान’ या विषयावर चाैथा परिसंवाद हाेईल. अध्यक्षस्थानी अमरावतीच्या नंदा तायवाडे असतील. प्रा. डाॅ. प्रतिभा अहिरे (नाशिक), प्रा. डाॅ. रेखा मेश्राम (संभाजीनगर), प्रा. डाॅ. फिरदाैस शेख (जळगाव), पुष्पा साळवे (जळगाव) हे सहभागी हाेणार आहेत.


