शासकीय लॉकडाऊनचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा मुक्ताईनगरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन


मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- शासकीय लॉकडाऊनचे नागरीकांनी तंतोतंत पालन करा तसेच प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे नागरीकांना केले. धुळे दौर्‍यावर निघालेल्या गृहमंत्री देशमुख यांनी मुक्ताईनगरात मंगळवारी दुपारी धावती भेट देत शासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांची बैठक घेत उपाययोजनांबाबत आढावा घेतला.बुलढाण्याहून शासकीय वाहनाने मुक्ताईनगरात दाखत झालेल्या गृहमंत्री देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहावर अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, आमदार चंद्रकांत पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुकाप्रमुख छोटू भोई, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, गटनेते राजेंद्र हिवराळे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर यांनी तालुक्याचा आढावा मांडला तर तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील व उपरुग्णालयाचे अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी मन्यारखेड्याबाबतची माहिती दिल्यानंतर देशमुख यांनी बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याचे आदेश दिले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरात नागरीकांच्या संरक्षणासाठी होमगार्ड व पीपीई कीटचा पुरवठा करण्याची मागणी केली तसेच कुर्‍हा व अंतुर्ली या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्यांची मागणी केली असून याबाबत निवेदन दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *