सोलापूर –
अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे आज मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्या सोलापूरचे जेष्ठ पत्रकार स्वर्गीय अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक महिलांचे तुटलेले संसार जोडले. महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्या स्वतः वकील असल्याने असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने महिलांचा आधार गेला. रात्री अपरात्री अडचणीत सापडलेली महिला त्यांच्याशी फोनवरून मदतीसाठी हाक द्यायची तेंव्हा त्या धावून जात असत. दरम्यान, गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेसपासून त्या सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.
अपर्णा रामतीर्थकर यांनी मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001 पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008 पासून ‘चला नाती जपू या’,‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.
कुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या. एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना ही हरवत चालली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित होत आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा असेही मत त्यांनी अनेकदा प्रगट केले होते.



