भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात अनेक ठिकाणी नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. काही दुकानदार मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता साहित्य विकत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या ५ पथकातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी दररोज प्रत्येकी तीन म्हणजे किमान १५ कारवाईच्या केसेस करणे गरजेचे आहे. अन्यथा पथकांवर कारवाई केली जाईल असा इशारा प्रांत रामसिंग सुलाणे यांनी दिला.ते प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.या बैठकीस तहसिलदार दिपक धिवरे, डीवायएसपी गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे, पोलिस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे,दिलीप भागवत,
रामकृष्ण कुंभार यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे निलेश माळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेने आणि पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा प्रांतांनी आढावा घेतला. गेल्या आठवड्यापासुन पालिकेने पाच पथके स्थापन केली असून, त्यांनी फक्त दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र एकही गुन्हा दाखल न केल्याने प्रांतांनी नाराजी व्यक्त केली.
नियम मोडल्यास,संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागणार आहे. त्यासाठी रस्त्यांवर आता अतिरिक्त पोलिस कुमक उतरवण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातुन शहरातील सर्व वार्ड,गल्ल्यांमध्ये जाऊन लाऊड स्पिकरद्वारे सकाळी ११ ते ५ या काळात फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच चालु राहतील,अशी सुचना नागरिकांना द्या,सकाळी ११ वाजेपुर्वी आणि सायंकाळी ५ नंतर जे दुकानदार त्यांची दुकाने उघडी ठेवतील. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, असे प्रांत सुलाणे सांगितले.



