भुसावळ (प्रतिनिधी )-
जीवनावश्यक वस्तु मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सरकारने जाहीर केले खरे परंतु रेशनवरील हक्काचे धान्यही नागरिकांना मिळत नसल्याने लेकरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न सामान्यांना पडला असल्याने भुसावळात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची तक्रार आज दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे केली आहे.
जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परिसरातील नागरीकांसाठी स्वस्त धान्य दुकान नंबर १२ कडू प्लॉट भागात असून त्यांच्याकडे शहरातील २१८ शिधापत्रिका आहेत. १००० पेक्षा जास्त नागरिकांना पुरवठा दुकानातून केला जातो म्हणून आज नागरिकांनी गर्दी केली, धान्य मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला व नागरिकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांना घटनास्थळी बोलवले होते.
प्रशासन व दुकानदाराच्या भानगडीत नागरिक अडचणीत:
गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येवू नये म्हणून रेशन सुरु झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळतेय. लॉकडाऊनमुळे अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकान दाराचे म्हणणे आहे की त्यांना या महिण्याचे फक्त ६ क्विंटल धान्य मिळाले आहे तर दुकानदाराकडे मागील महिन्याचे धान्य शिल्लक असल्याने त्यांना कमी धान्य दिले आहे, प्रशासनाच्या व दुकानदाराच्या भानगडीत नागरिकांची अडचण वाढली आहे असे तक्रारीत प्रा.धिरज पाटील यांनी नमूद केले आहे.
सकाळीच प्रा.पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याशी चर्चा केली व नागरिकांच्या समस्या मांडल्या.
पंतप्रधानांच्या जाहीर आश्वासनाला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सुध्दा येथील लोकांना धान्य मिळालेले नाही. तीन महिन्यासाठी मिळणाऱ्या रेशनचे सोडा नेहमीच्या हक्काचेही रेशन आम्हाला मिळत नाही. ८० कोटी लोकांना रेशन देण्याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान मोंदीच्या शब्दाला अधिकाऱ्यांनी खोटे पाडू नये अशी प्रतिक्रिया पंकज इंगळे यांनी दिली.
पंकज इंगळे, पुष्कर वारके, दिनेश बळके, कैलास भोई, संजय भिरुड, छगन ठाकूर, लतिका महाजन, मोहन पाटील, भीमाबाई सावकारे, नितीन काकडे, ज्ञानेश्वर कुंभार, अरुण साळवे, गजानन पवार, प्रल्हाद कुंभार, वसंत पाटील, वासुदेव पाटील, रज्जक गवळी, वसंत तायडे, किशोर बऱ्हाटे, राजेंद्र कुंवर, भारती पाटील, सुनीता पाटील, राहुल चौधरी यांनी आरसीनंबर सहित तक्रार दाखल केली आहे.



