जळगाव – पाचोरा तालुक्यातील परधाडे ते माहेजी स्टेशन दरम्यान वडगाव बुद्रुक गावाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये १२ मृतदेह हाती लागले असून ते जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर काही जखमींवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांनी धाव घेऊन मयताच्या नातेवाईकांशी संवाद साधला आहे. तसेच त्यांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. रुग्णालयामध्ये नातेवाईकांकडून मोठा आक्रोश केला जात आहे. दरम्यान अनेक मृतदेह हे कापले गेले असल्यामुळे अपघाताची भीषणता लक्षात येत होती.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एकूण १२ मृतदेह दाखल झाले आहेत. या १२ मृतदेहांपैकी ७ मृतदेहांची ओळख पटली आहे. यात ९ पुरुष आणि ३ महिला मयत आहेत.
हिंदू नंदराम विश्वकर्मा (वय ९ ते ११ रा. नेपाळ) लच्छी राम पासी (वय अंदाजे १८ ते २३ रा. नेपाळ) कमला नवीन भंडारी (वय ४३ रा. नेपाळ), जवकला बुट्टे जयगडी (वय ५०), नसिरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (वय १८ ते २० रा.कोंडा) इम्ताज अली (वय ३५ रा. गुलऱीहा उत्तर प्रदेश) बाबू खान (वय २७ ते ३०) असे ओळख पटलेल्या मयत व्यक्तींचे नाव आहे.
गोदावरी रुग्णालयात ५ तर विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा येथे ५ जखमींना दाखल करण्यात आले आहे. एकूण २४ जण जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.


