भुसावळ : तालुक्यातील कुर्हे ( पानाचे ) गावापासून एक किलोमीटर अंतरावरील उंच टेकडीवर निसर्गरम्य परिसरात विक्रम सवंत 1111 मधील हेमाडपंथी पद्धतीनें बांधलेले नाथसंप्रदायातील चौरंगीनाथ महाराजांचे मंदिर आहे. ब्रिटिश काळात १२ जून १८६३ रोजी सनद घोषित झालेले हे नाथपंथीय मंदिर श्री क्षेत्र चौरंगीनाथ बाबा मंदिर हे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणे शक्य आहे.

पोळा सणाच्या पाडव्याला येथे यात्रा भरते. जिल्ह्यातील भाविक मानलेले नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती देतात. यातूनच या स्थळाची पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिकता व नैसर्गिक वातावरण जोपासण्यात आले आहे. याची दखल घेवून भाविकांसाठी नागरी सुविधा व सुशोभिकरणासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून २००८-०९ मध्ये शासनाकडून 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पाटील यांच्या प्रयत्नाने सुमारे 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यातून सुशोभिकरण म्हणून काही कामे करण्यात आली आहेत. त्यात मंदिराला मुख्य प्रवेशद्वार व टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व कठडे, भक्त निवास (सभागृह) याचा समावेश आहे.
गावाच्या चारही बाजूंना डोंगरदर्यांमध्ये विविध पाझर तलाव असून अनुक्रमे सिंचन व लघुपाटबंधारे प्रकल्प, तेलखोरा पाझर तलाव, कुर्हे-वराडसीम (गुंडाईत तलाव), सुयाबरळ पाझर तलाव, जोगलखोरी पाझर तलाव, कुर्हे-मोंढाळा पाझर तलाव (बांड्यावड तलाव) अशा ठिकाणी पाण्यांचा साठा व स्त्रोत असलेले विविध तलाव आहेत. या जलसाठय़ांमुळे पशू-पक्षी व प्राण्यांचा मुक्त विहार असतो. तीर्थक्षेत्रासोबतच या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार निर्मितीसोबत वनसंपत्तीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
चौरंगीनाथ महाराजांचा नवस फेडण्यासाठी होते गर्दी
चौरंगीनाथ महाराजांच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव असतो. जिल्ह्यातील व रिसरातील गोजोरे, सुनसगाव, बेलव्हाय, नशिराबाद, वराडसीम, जोगलखोरी, खंडाळा, मोंढाळा, शिंदी, महादेवमाळ, मुशाळतांडा, भिलमळी, मांडवेदिगर भुसावळ, जामनेर येथील भाविकांनी मानलेले नवस फेडण्यासाठी मंदिरावर गर्दी होत असते. भाविक चौरंगीनाथ महाराजांना कळण्याची भाकरी व लाल चटणी (सांड्या सांभार) हा नैवेद्य दाखवतात. काही भाविक बैलजोडीला घेऊन दर्शनासाठी येतात.
दरम्यान, यात्रेसाठी मंदिराला व मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला रंगरंगोटी केली होती. आदल्या दिवशी गावातून चौरंगीनाथ बाबांच्या पालखी सोहळा काढण्यात येतो. यात्रेत विविध प्रकारची खेळणे, पाळणे, खाद्यपदार्थांची दुकाने सजलेली असतात.
या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाली मूर्ती प्राणप्रतिष्ठा:
यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर येथील चौरंगीनाथ बाबा मंदिरावर चौरंगीनाथ महाराजांच्या मूर्तीची गावातून मुख्य मार्गावर मिरवणूक काढून मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या अगोदर मंदिरामध्ये नवनाथांना शिळारूपात पुजन केले जात होते. आताही मंदिरात त्या आहेत. परंतु त्या नवनाथांपैकी चौरंगीनाथ महाराजांचे भक्तांना दर्शन व्हावं म्हणून चौरंगीनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याचे ट्रस्टचे सदस्य तथा पुजारी रूपा नाथ यांनी सांगितले.




