धुळे : तालुक्यातील निमडाळे येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आठवीच्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हितेश सूर्यवंशी-पाटील (वय १४) व मयूर वसंत खोंडे (वय १४, दोघे रा. ता. जि. धुळे) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. निमडाळे येथील जयहिंद शाळेच्या इयत्ता आठवीचा विद्यार्थी हितेश सूर्यवंशी पाटील व मयूर वसंत खोंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची वनभोजनासाठी सहल गेली होती. यावेळी परिसरात तलावासह खदान होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे हितेश व मयूर हे तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडायला लागले.
तेथील शिक्षकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. तेथील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांना बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


