रस्ता सुरक्षा प्रकरणी शिवसेना आक्रमक -शिवसैनिकांचा प्रकल्प अधिकाऱ्यांस घेराव ; रास्तारोकोचा इशारा –

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गा दरम्यान शहराला लागून ७ किलोमीटर मार्गावर सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याने या मार्गावर अजूनही अनेक बळी जात असल्याने येथील संतप्त शिवसैनिकानी २६ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रकल्प अभियंते सुजानसिंह यांना घेराव घालून वेठीस धरले . त्वरित कार्यवाही न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी संतप्त शिवसैनिकानी दिला .
यावेळी शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, विभाग प्रमुख हर्षल चौधरी, विभाग प्रमुख सचिन चौधरी, बाळा ढाके, अमोल पाटील यांच्यासह संतप्त शिवसैनिक सहभागी होते .
रस्ते अपघात होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात शहरातील रस्त्यांवर खूप अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेले आहेत. कार, मोटारसायकल व इतर वाहनांमध्ये अपघात होऊन प्रसंगी मृत्यू होतो. त्यात दुचाकीवरील मृत्यूची संख्या जास्त आहे. अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे वाढते अपघात चिंतेची बाब आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा मार्ग या रस्त्यांचे जाळे भुसावळ शहरात जास्त आहे. त्यात काही रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे, तर काही महामार्ग अरुंद आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. चौपदरीकरण सुरू असल्याने व शहरात सर्वाधिक मार्ग असल्याने अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. कंटेनरसारखी वाहने रस्त्यावर बंद पडल्यानंतर रस्त्यावरच उभी केली जातात. हॉटेल, धाब्यांवर थांबण्यासाठी कंटेनरचालक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रीच्या वेळी हे कंटेनर न दिसल्यास त्यावर इतर वाहने आदळून अपघात होतात राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच चौपदरीकरणाचे काम करणारी कंपनी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी व सुरक्षा वाढवावी अशी मागणी बबलू बऱ्हाटे व शिवसैनिकांनी केली.
देना पेट्रोल पंपासमोरील रस्ता अपघाताचे प्रमाण वाढवणारा असून त्यावर धूळ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे समोर येणारी वाहने दिसतसुद्धा नाहीत. रात्रीच घडलेला प्रकार विडिओच्या माध्यमातून या वेळेस त्यांना दाखवण्यात आला.
यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी वर्गावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल व नागरिकांच्या वतीने शिवसेना भुसावळ शहर रास्तारोको करून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षेच्या योग्य उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन प्रकल्प अभियंता सुजानसिंह यांनी यावेळी दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *