भुसावळातील निकृष्ट रस्ता कामांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार –


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील निकृष्ट रस्ता कामांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास सचिव महेश पाठक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. रस्त्यांची कामे करताना पालिकेच्या स्थानिक अभियंत्यांकडे साध्या भेटीसुद्धा दिल्या जात नाहीत शिवाय निकृष्ट पद्धत्तीने रस्त्यांची कामे होत असल्याने या कामांचे पूर्ण निरीक्षण गुणवत्ता व संनियंत्रण समितीमार्फत करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार दिनेश शंकरलाल उपाध्याय यांनी केली आहे.
उपाध्याय यांच्या तक्रारीनुसार, भुसावळ पालिकेने शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी गेल्या दिवसांपूर्वी निविदा काढली होती मात्र भुसावळ शहरातील गांधीनगर ते शिवाजीनगर, एस.के.ऑईल मिलपर्यंतच्या रस्त्याचे काम त्या अंतर्गत सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामासाठी गिट्टी व मुरूम-मातीचे मिश्रण करून रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्यावर देखरेख ठेवण्याची जवाबदारी पालिका अभियंत्यांची असताना कुठल्याही नगरपालिकेच्या अधिकार्‍याने साधी भेटदेखील या कामाला दिली जात नाही त्यामुळे कंत्राटदाराच्या सुपरवायझर यांनी आपल्या मर्जीने काम केले आहे. या रस्ता कामाची गुणवत्ता व संनियंत्रण समितीकडून चौकशी केल्यानंतर व अहवाल प्राप्त झालयानंतरच संबंधित ठेकेदाराला बिले अदा करावीत, त्यापूर्वी बिले अदा करू नये, असेही या तक्रारीत नमूद आहे.

मुख्याधिकारी म्हणाले, माहिती घेतो
मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रस्ता कामाच्या तक्रारीविषयी अद्याप आपणास कल्पना नाही मात्र लागलीच अभियंत्यांस रस्ता कामाच्या चौकशीसंदर्भात पाठवत असल्याचे ते म्हणाले.

पालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे
शहरातील जुना सातारा भागातील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आवाज उठवून शासन स्तरावर तक्रार केली होती व त्यावेळीदेखील मुख्याधिकार्‍यांनी तक्रार आल्यानंतर चौकशीसाठी अभियंत्यांना पाठवले होते मात्र स्थानिक पालिका प्रशासनातील अधिकारी तथा मुख्याधिकार्‍यांनी शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत असताना लागलीच भेटी देवून कामांची पाहणी करणे त्यांचे कर्तव्य असतानाही केवळ तक्रार आल्यानंतर अधिकारी दखल घेत असल्याने सुज्ञ भुसावळकरांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *