फैजपूर (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून शिक्षण घेत यावल तहसीलच्या महसूल विभागात पुरवठा विभागात लिपिक म्हणून काही महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेल्या सागर राजेंद्र तेली (35) या तरुणांने बुधवारी दुपारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. सागर यांचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेने यावलसह फैजपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. फैजपूरच्या सराफ कॉलनीत राजेंद्र तेली यांच्या परिवाराचे वास्तव्य होते. त्यांचा मुलगा सागर याने दिवस-रात्र मेहनत घेऊन नोकरी मिळवली व तो सध्या यावल तहसील कार्यालयात पुरवठा विभागात लिपिक म्हणून रूजू झाला. बुधवारी दुपारी राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरी बांधून सागरने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सागरचा मृतदेह यावलला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गुरुवार, 18 रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. फैजपूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील करीत आहे. दरम्यान, मयत सागरच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.



