मोलकरणीकडून दोन घरांमध्ये हातसफाई; साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, आरोपी महिला अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सी येथे घरकाम करणाऱ्या मोलकरणीने दोन घरांमधून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, जि. अमरावती, सध्या रा. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) हिला अटक केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) यांच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी समोतीबाई धांडेकर या गेल्या चार महिन्यांपासून काम करत होत्या. तसेच समोरील बंगल्यात राहणारे पियूष दीपक संघवी यांच्या घरीही त्या मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कामाला होत्या.

दरम्यान, २५ मे रोजी सुधा काबरा या जालना येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र व मंगलपोत काढण्यासाठी पाहिले असता ते गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पती व मोलकरीण यांच्याकडे चौकशी केली; मात्र दागिन्यांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

यानंतर २७ मे रोजी त्या घरी परतल्यानंतर समोतीबाई धांडेकर या २६ मे रोजी मूळ गावी गेल्याचे समजले. त्याचवेळी शेजारी राहणारे पियूष संघवी यांनी घरातील दागिने तपासले असता त्यांच्या पत्नी तेजल संघवी यांचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस व कानातील टॉप्सही गायब असल्याचे आढळून आले.

काही दिवसांनी समोतीबाई धांडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी जळगावात येणार असल्याचे सांगितले, मात्र त्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणीही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे सुधा काबरा व पियूष संघवी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, आरोपी महिलेने सुधा काबरा यांच्या घरातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगलपोत चोरले. तसेच तेजल संघवी यांचा ७५ हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस आणि ४० हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी समोतीबाई धर्मराज धांडेकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.