भुसावळमध्ये गोवंश कत्तलीवर पोलिसांचा छापा; ९ जिवंत जनावरांची सुटका, दोघांना अटक :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील आगाखानवाडा परिसरात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ९ जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य पसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार, ९ मे रोजी सकाळी सुमारे ७.५० ते १० वाजेदरम्यान पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी मुस्ताक खान रहीम खान (वय ४७) व सैय्यद असरद गफार (वय ३४, दोघेही रा. आगाखानवाडा, भुसावळ) हे गोवंशाची कत्तल करताना आढळून आले. त्यांच्या साथीदारांपैकी २ ते ३ जण घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

छाप्यात पोलिसांना कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस, डोके तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने आढळून आली. याशिवाय ९ जिवंत गोवंश बांधून ठेवलेले आढळल्याने त्यांची सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून मांस, हातगाडी, कोयते, कुऱ्हाडी, चाकू व इतर साहित्य असा एकूण सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी हवालदार नितीन दगडू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पथकातील कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वाजे यांनी केली.