भुसावळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्यानंतर एसटी बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आबालवृद्ध, अपंग तसेच महिला प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहनधारकांकडून आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार पुढे येत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष विलास रामदास पाटील, युवा तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, गोजोरा येथील सरपंच पती व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, उपसरपंच चंद्रकांत पाटील, विकासो सदस्य विजयसिंग पाटील, रामदास झाडखंडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी भुसावळ बस स्थानकाचे व्यवस्थापक राकेश शिवदे यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळांना सुट्टी आणि प्रवाशांचा अभाव ही कारणे देत एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यातून आर्थिक लूट होत आहे. जेष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही, तर महिला वर्गही बस प्रवासापासून वंचित राहत आहे.
तसेच बेलव्हाळ, सुनसगाव, गोजोरा, वराडसिम आदी गावांमध्ये एसटी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विलास पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


