भुसावळात उद्या प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभ :

भुसावळ (प्रतिनिधी ) : सर्व महापुरुष आणि महानायिका यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उद्या, शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ . ३० वाजता भुसावळ शहरात तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीते वर सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शंभुराजे चौक, डी.एल. हिंदी हायस्कूल मागे, गांधी नगर येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी समाजप्रबोधनकार म्हणून सत्यपाल महाराज (सप्तखंजीरीवादक), अकोट, जिल्हा अकोला यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांमधून सामाजिक जाणीवा, शिक्षणाचे महत्त्व आणि सकारात्मक परिवर्तन यांवर प्रकाश टाकला जाणार आहे.

कार्यक्रमात भुसावळ शहरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, गांधी नगर, खडका रोड, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील सर्व सुजाण नागरिक, सेवानीवृत्त कर्मचारी तसेच युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.