जळगाव (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. सध्या जळगावचा पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला असून एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, जळगावमध्ये सध्या आकाश अंशतः ढगाळ असून तापमान ४२ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. आर्द्रता ११ टक्के असून वाऱ्याचा वेग २०.५ किमी प्रतितास आहे. दृश्यमानता १० किमी इतकी आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भर दुपारी बाहेर पडणे टाळावे, डोके व शरीर झाकून ठेवावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच शक्यतो थंड ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काम, प्रवास किंवा शाळेसाठी बाहेर पडताना वेळेचे योग्य नियोजन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
दरम्यान, १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत असून पुणे विभाग, मराठवाडा (विशेषतः दक्षिण भाग व छत्रपती संभाजीनगर विभाग) तसेच विदर्भातील काही भागांतही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २२ एप्रिलपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
हवामानातील या बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


