भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असताना प्रशासनाने उमेदवारांना महत्वाची सूचना केली आहे. चिन्ह वाटपाच्या वेळी उमेदवार स्वतः उपस्थित राहू शकणार नसल्यास, त्यांच्या वतीने फक्त प्राधिकृत (अधिकृत) प्रतिनिधीलाच संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची अनुमती दिली जाणार आहे. याबाबत निवडणूक विभागाने स्पष्ट निर्देश जारी केले आहे व अनधिकृत किंवा तृतीय पक्षाला प्रवेश दिला जाणार नाही.

चिन्ह वाटप हा महत्त्वाचा टप्पा
चिन्ह वाटप हा निवडणुकीतील अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याने उमेदवारांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे मात्र अपरिहार्य कारणास्तव उमेदवार उपस्थित राहू शकत नसल्यास त्यांनी पूर्वनियोजित अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक करून त्याची माहिती निवडणूक अधिकार्यांकडे नोंदवणे बंधनकारक आहे. संबंधित प्रतिनिधीचा फोटो, ओळखपत्र व अधिकृत परवानगी पत्राशिवाय प्रक्रिया मान्य होणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, कोणत्याही गैरसमजाला वाव न देता प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि नियमबद्ध राहण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.


