उज्वला बागुल | /भुसावळ –
भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेतलेले भाजपचे बंडखाेर सुनील काळे हे हाेत. त्यांनी तर थेट ‘वरणगाव येथील भाजपचे तिकिट वाटप हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विराेधक असलेले आमदार एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर झाले आहे’ असा गाैप्यस्फाेट केला आहे. त्यांचे हेच टिकेचे बाण जिव्हारी लागल्याने भुसावळचे मंत्री संजय सावकारे यांचे पित्त खवळले आहे. म्हणूनच त्यांनी ‘सुनील काळे हा थाेतांड करणारा माणूस आहे. त्याच्याकडे गाडी, बंगला आहे. मात्र, तरी ताे हंडा घेऊन भीक मागत फिरताे आहे’ अशा शब्दात काळे यांचा समाचार घेतला आहे.

भाजपचे बंडखाेर सुनील काळे हे वरणगावात भाजप नेत्यांनी आपल्यावर कसा अन्याय केला आहे हे घराेघरी जाऊन व राेज समाज माध्यमांवर भूमिका मांडून लाेकांना पटवून देताहेत. अल्पसंख्याक म्हणून आपल्याला कसे डावलले गेले याच्यावर त्यांचा अधिक भर आहे. अर्थात, त्याचा परिणाम भुसावळातील भाजपवर हाेताे आहे. इथे तर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे मंत्री सावकारे यांना राेज वरणगावच्या विषयावर स्पष्टीकरण द्यावे लागते आहे. दाेन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेंद्र विश्वनाथ चाैधरी यांनीही सावकारेच्या संदर्भात माेठा गाैप्यस्फाेट करून खळबळ उडवून दिली हाेती. तेव्हाही सावकारे यांना माध्यमांसमाेर स्पष्टीकरण द्यावे लागले हाेते.
वरणगावात काळेंसाठी ‘लाेकनिधी’
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा भाजपचे बंडखाेर उमेदवार सुनील काळे यानी वरणगावात दिला आहे. भाजपने ठेकेदार असलेल्या अतुल झांबरेंच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाचे तिकिट कसे दिले आणि आपल्याला का दिले नाही? हे पटवून सांगण्याचा प्रयत्न काळे यांची टिम पद्धतशीरपणे करीत आहे. राेज निघणाऱ्या प्रचारफेरीत स्वयंप्रेरणेने विविध वयाेगटातील शेकडाे लाेक त्यांच्या साेबत सहभागी हाेताहेत. सर्व जाती-धर्माचे लाेक त्यात असतात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. प्रचारफेरीत साेबत एक हंडा असताे त्यात लाेक यथाशक्ती ‘लाेकनिधी’ त्यांना निवडणूक लढण्यासाठी देताहेत. हे व्हीडीओ प्रचंड व्हायरल हाेत असून त्याचे पडसाद भुसावळात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘पाणीदार’ पण अणुकुचीदार राजकारण
वरणगाव पाणीपुरवठा याेजनेसाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ग्रामपंचायत असल्यापासून यशस्वी पाठपुरावा केला. कधी काळी पंधरा ते अठरा दिवसांनी या गावाला पाणी मिळायचे. मात्र, काळे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याने इथली पाणी याेजना आकारास आली. त्यात त्यांना सर्वच राजकीय पक्षांचे सहकार्य लाभले हा भाग अलाहिदा. मात्र, त्यासाठी त्यांनी जी पदरमाेड केली तीही दुर्लक्षून चालणार नाही. या याेजनेसाठी आपण काय केले, कसे केले, अडथळे दूर कसे केले याची जंत्री ते काॅर्नर बैठकांत मांंडताहेत. त्याचा हा मुद्दा लाेकांंना पटताे आहे. म्हणून त्यांचा जनाधार वाढू लागला आहे. त्यांच्यावर विराेधक कितीही टिका करीत असले तरी त्यांनी अजुनपर्यंत टाेकाची भूमिका घेतलेली नाही.


