भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भुसावळ-लखनऊ व मनमाड-लखनऊ दरम्यान एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 22 व 23 नोव्हेंबर रोजी या विशेष गाड्या धावणार असून उत्तर भारतात जाणार्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी भुसावळ ते लखनऊ ही विशेष गाडी (क्रमांक 01101) दुपारी चार वाजता भुसावळ येथून सुटली. दुसर्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता लखनऊ येथे पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई व कानपूर सेंट्रल हे प्रमुख थांबे आहेत. या गाडीत वातानुकूलित तृतीय श्रेणी, शयनयान व सामान्य डब्यांसह दोन गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
त्याच दिवशी शनिवारी मनमाड-लखनऊ विशेष गाडी (क्रमांक 01035) मनमाड येथून दुपारी 12.10 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 11.10 वाजता लखनऊ येथे पोहोचेल. भुसावळसह सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीचे थांबे असतील.
यानंतर 23 नोव्हेंबरला मनमाड-लखनऊ ही विशेष गाडी (क्रमांक 01033) दुपारी 12.10 वाजता सुटणार असून तिचाही प्रवास शनिवारी सुटणार्या गाडी प्रमाणेच असेल, वेळ, थांबे व आगमन वेळेत काही बदल झालेला नाही. या गाडीत सामान्य डब्यांची संख्या अधिक असून प्रवाशांना भरपूर जागा उपलब्ध होणार आहे.
तसेच रविवार, 23 नोव्हेंबर रोजी भुसावळ-लखनऊ ही आणखी एक एकेरी विशेष गाडी (क्रमांक 01013) संध्याकाळी चार वाजता भुसावळ येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता लखनऊ येथे पोहोचेल.
प्रवासासाठी आवश्यक असलेले थांबे व वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मोबाईल अॅपचा वापर करावा,असे आवाहन मध्य रेल्वेकडून केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर प्रवाश्यांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


