भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी नंतर बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली होती. २१ रोजी नगराध्यक्षांचे २ अर्ज तर नगरसेवक पदाचे ७६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये अध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे
अध्यक्ष पदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी शुक्रवारी स्वाती श्रीकांत बाविस्कर व रुपाली अमोल चौधरी यांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात आठ उमेदवार असतील तर नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी 339 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते मात्र अखेरच्या दिवशी 78 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 247 उमेदवार असतील. भाजपाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या असून 47 जागांसाठी आता 247 उमेदवारांमध्ये लढत होईल.

भुसावळात भाजपाच्या दोन जागा बिनविरोध
भाजपाच्या दोन उमेदवारांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या दोन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 21 ब मधून साईसेवक पिंटू उर्फ निर्मल कोठारी तसेच प्रभाग 23 अ मधून महिमा अजय नागराणी बिनविरोध निवडून आल्या आहेत. भुसावळातील साईसेवक पिंटू कोठारी प्रभाग क्रमांक 21 ब मधून भाजपाचे उमेदवार होते मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आऊँ चौधरी यांनी अखेरच्या दिवशी शुक्रवारी माघारी घेतल्याने व या प्रभागातून केवळ दोनच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
भाजपाने तीन जागांवर मिळवला विजय
माघारीच्या दिवशी दोन उमेदवारांनी अचानक घेतलेल्या माघारीनंतर भाजपाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या तर प्रभाग सात अ मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सारीका युवराज पाटील यांच्या अर्जासोबत जोडलेला एबी फार्म हा त्यांचे पती युवराज पुंडलिक पाटील यांच्या नावाचा पक्षाने दिल्यानंतर त्या अपात्र ठरल्याने येथे भाजपाच्या प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या. आतापर्यंत भाजपाने तीन जागांवर मुसंडी मारल्याने भाजपेयींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे दोन जागांवर महिलांनी यश मिळवले आहे.
*वरणगांव नगराध्यक्ष पदासाठी तिघांची माघारी; आठ उमेदवार रिंगणात *
वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांनी आज माघार घेतल्याने स्पर्धेत आता आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शहरातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांमध्ये चर्चा-परिचर्चा, बैठका आणि रणनीती यांना वेग आला आहे.
आज जितेंद्र भागवत पाटील आणि फकीर जावीदशा बाबुशा या दोघांनी तर गुरुवारी रुक्मिणी काळे यांनी आपल्या उमेदवारी अर्जांची माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची लढत अधिक चुरशीची होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, नगरसेवक पदासाठी एकूण 104 उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी एका आणि आज शुक्रवारी आणखी 13 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता 90 उमेदवार 10 प्रभागांमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
उद्यापासून प्रचाराचा धुराळा : शहरात राजकीय खेळी, समझोते आणि समर्थनाबाबतच्या चर्चा जोरात असून येणारे दिवस निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या झडणार फैरी
उमेदवारांच्या माघारीनंतर खर्या अर्थाने शनिवार, 22 रोजी पासून शहरात निवडणुकीचा आखाडा तापणार आहे. सत्ताधारी व विरोधक नेत्यांच्या सभेतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या निमित्ताने झडणार आहे. शहरातील विकास ,अमृत योजना, पाणी, रस्ते, ठेकेदारी आदी मुद्दे प्रचारात चर्चेत राहणार आहेत.


