भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत पृथ्वीवरील निसर्गनिर्मित संपत्तीचे रक्षण व सर्व सजीवांना आवश्यक असलेल्या वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले.

या दिवशी भूदल, नौदल व वायुदलातील शूर सैनिकांचे बलिदान, देशरक्षणातील त्यांचे अमूल्य योगदान आणि सीमा रक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून सेवा करणाऱ्या जवानांचा सन्मान केला जातो. युद्धात शहीद झालेल्यांच्या किंवा जखमी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी या दिवशी छोटे झेंडे देऊन निधी संकलित केला जातो.
डॉ. पाटील म्हणाले,
“सैनिक देशाचे रक्षण करतात, तसे निसर्गरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
अलीकडच्या काळात अवाजवी वृक्षतोड, खनिज-वनसंपत्तीचे नुकसान आणि पर्यावरणीय असंतोलामुळे जीवनावश्यक संसाधनांची हानी होत आहे. वृक्षसंख्या कमी झाल्याने तापमानवाढ, दुष्काळ, प्रदूषण आणि अनेक पर्यावरणीय समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हे पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीवांसाठी धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर, डॉ. पाटील यांनी सैनिकांप्रती आदर म्हणून निसर्गाच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले “जसे सैनिक सीमेवर उभे राहून आपले रक्षण करतात, तसे आपण पृथ्वीवरील संपत्तीचे आणि निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण समतोल राखण्यासाठी विविध प्रकारचे वृक्ष संगोपनासहित लावणे गरजेचे आहे.”
तसेच पंतप्रधानांनी राबविलेल्या ‘एक पेड़ माँ के लिए’ या अभियानातही नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी म्हटले आहे


