जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मे दरम्यान कलम ३७ लागू ; पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक

भुसावळ, दि. १५ (प्रतिनिधी) — आंतरराष्ट्रीय घडामोडी, जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव, विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी तसेच संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) नुसार हे आदेश जारी करण्यात आले असून, ते १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करण्यास, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देण्यास, आक्षेपार्ह हावभाव करण्यास तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमांचे दहन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तसेच, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव जमविण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीशिवाय सभा, मोर्चा किंवा मिरवणूक काढल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ आणि प्रेतयात्रांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.