जळगाव – शहरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज सोमवार रोजी मानराज पार्क चौफुलीवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, ओम सुनील गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ओम थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याला काही अंतर फरपटत नेण्यात आले. या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत ओमने प्राण सोडले होते. अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून त्याच्या आई आणि बहिणीने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
मानराज पार्क चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहनचालक सुसाट वाहने चालवतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी येथे तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी केली आहे. अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या मदतीने ओमचा मृतदेह उत्तरविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती


