भुसावळ (प्रतिनिधी) – महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात हक्काचे स्थान मिळावे, यासाठी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या घटनादुरुस्तीला कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी तसेच इंडि आघाडीतील काही घटक पक्षांनी विरोध दर्शविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जळगाव जिल्हा पूर्वतर्फे महिलांच्या सन्मानासाठी व विरोधी पक्षांच्या भूमिकेविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ येथे संध्याकाळी ६ वाजता काढण्यात येणार आहे.
वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात होणार असून, त्यांच्या तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडणार आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढवून निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळवून देण्यासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जळगाव जिल्हा पूर्वमधील सर्व मंडळांतील भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला आघाडी शहर अध्यक्ष अनिता आंबेकर, भुसावळ दक्षिण विभाग व सौ वैशाली सैतवाल, भुसावळ उत्तर विभाग यांनी केले आहे.


