नवापुरात ९३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

नवापूर – तालुक्यातील रायपूर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई ९३ लाखांचा मद्यसाठा आणि वाहने.जप्त केली आहे. गुजरातला तस्करी करण्याच्या उद्देशाने टेकडीच्या आडोशाने लपवलेला हा साठा पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून चार वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अवैध मद्य साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ९२ लाख ७८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रायपूर गावच्या शिवारात एका टेकडीच्या आड गुजरातला तस्करीसाठी ही दारू साठवून ठेवण्यात आल्याचा संशय आहे.

अशी केली कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. नवापूर तालुक्यातील रायपूर परिसरातील भावीन कोकणी हा आपल्या शेतालगतच्या जंगलात अवैधरित्या मद्यसाठा करून त्याची वाहनांद्वारे वाहतूक करत असल्याचे समजले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायपूर येथील शेतालगतच्या टेकडी परिसरात छापा टाकला. यावेळी काही इसम व चारचाकी वाहने संशयास्पद स्थितीत आढळली. पोलिसांचा सुगावा लागताच काहींनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी धर्मेश मंगू धोडी ( ३६, एकलारा) याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान जप्त केलेला मद्यसाठा हा भावीन कोकणी याचा असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून चार चारचाकी वाहने तसेच मोठ्या प्रमाणात मद्याचे बॉक्स जप्त केले. या वाहनातून या विदेशी मद्याची गुजरातकडे तस्करी केली जात असल्याच संशय आहे. या कारवाईत सुमारे ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवापुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.