पालकशाळेच्या ‘वाचू आनंदे’ वाचन उपक्रम उद्घाटन :

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक पुस्तक दिनानिमित्त रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळेच्या वतीने ‘वाचू आनंदे’ या वाचन उपक्रमाचा शुभारंभ जेष्ठ विधीज्ञ आणि शिक्षण संस्था चालक ॲड. सुशील अत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. मुले आणि पालकांमधील वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या अंतर्गत दर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीत पालक व मुले त्यांच्या सोयीनुसार संस्थेच्या पालक – बालक संवाद केंद्रात पुस्तके वाचण्यासाठी येऊ शकतात. आई बाबांसाठी पालकत्व व मुलाच्या आवडी व वयोगटानुसार असलेली अनेक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध असतील.

यावेळी बोलतांना ॲड.अत्रे म्हणाले की, आजकाल मुलांना एखादी वस्तू मागितल्यावर लगेच मिळते, त्यामुळे संघर्षाची जाणीव कमी होत आहे. यासाठी पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे मुलांना मिळालेल्या प्रचंड गतीला योग्य प्रतिसाद देत, आवश्यक त्या ठिकाणी ‘ब्रेक’ लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमुद करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी डॉ. विशाखा पाटील यांनी पालक शाळेच्या वतीने तसेच वाचन उपक्रमाच्या निमित्ताने, ॲड. अत्रे यांच्या मार्फत वाचन कट्ट्यास प्राप्त झालेल्या पुस्तकांचा प्रातिनिधिक स्वीकार केला.या उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्याचे माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी मातोश्री कै .इंदुबाई वसंत वाणी (भोकरे) यांच्या स्मरणार्थ पुस्तकांसाठीची मदत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत पाटील यांनी केले. या वेळी रिफ्लेक्शन फाऊंडेशनचे संचालक रत्नाकर पाटील, आकाशवाणीचे सतीश पप्पू, होप फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश भोसले, अजिंठा फिल्म सोसायटीचे किरण सोहळे व डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे, शैलेश शिरसाट, क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.सुचित्रा लोंढे ,सचिन कोल्हे, निलेश पाटील आदी उपस्थित होते.