भुसावळात मोठी कारवाई! महानिर्मितीच्या अधिकाऱ्याचे निलंबन

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्थिक अनियमितता, नियमबाह्य खरेदी आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपांमुळे महानिर्मितीने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कार्यकारी अभियंता उमेश रघुनाथ ढोक यांना तत्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ऊर्जा विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष समितीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. एकाच आयटम कोडचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच बजेट नियमांचे उल्लंघन, वर्क ऑर्डरचे विभाजन आणि पूर्वमंजुरी न घेता खरेदी केल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय, एकाच बोलीदारांना वारंवार संधी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पेमेंट प्रक्रियेतही गंभीर त्रुटी आढळल्या असून, केवळ प्रमाणपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची देयके दिल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकाराच्या अर्जांना योग्य प्रतिसाद देण्यात टाळाटाळ केल्यामुळे या प्रकरणावरील संशय अधिक गडद झाला.

ऊर्जामंत्री सचिवालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत ढोक यांना दर सोमवारी खापरखेडा येथे हजेरी लावावी लागणार आहे.

महानिर्मितीने स्पष्ट केले आहे की, संस्थेमध्ये पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांवर आणखी कठोर पावले उचलली जातील.