भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामीनी फाउंडेशन आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३ एप्रिल रोजी श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृह (नाभिक समाज), हॉटेल प्रीमियरच्या मागे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सुनंदा औंधकर, नगरसेविका सोनल महाजन, डॉ. छाया फालक तसेच स्वामीनी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियांका चौधरी यांच्यासह कांताई नेत्रालयाचा स्टाफ उपस्थित होता.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो गरजू लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू तपासणीवर भर देण्यात आला. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी चार ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियांका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष विजया निकम, सचिव उज्वला बागुल, सल्लागार अनिता आंबेकर तसेच सदस्य जया इंगळे, मनीषा धांडे, साधना मोहरील, पल्लवी सोनार आणि कांताई नेत्रालयाच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन लतिका क्षीरसागर यांनी मानले.



