भुसावळ पालिका : 177 विषयांवरील निर्णय 12 एप्रिलला; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाकडे लक्ष

भुसावळ(प्रतिनिधी): भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या 250 हून अधिक विषयांपैकी 177 विषयांवर भाजपाने घेतलेल्या हरकतींप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पूर्ण झाली असून, या प्रकरणाचा अंतिम निर्णय रविवार, 12 एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांचे लक्ष आता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

पालिकेत सत्तांतरानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्याच सभेत मोठ्या प्रमाणावर विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, यातील 177 विषय नियमबाह्य व पक्षपाती असल्याचा आरोप करत भाजपाने महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. त्यानंतर या विषयांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

या प्रकरणी नुकतीच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनात अंतिम सुनावणी पार पडली. सुमारे सात वाजेपर्यंत चाललेल्या या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. भाजपाच्या वतीने अॅड. भगवती गामोट यांनी संबंधित विषयांमधील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे अॅड. कात्यायनी यांनी हे विषय शहराच्या विकासाशी संबंधित असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम निर्णय 12 एप्रिल रोजी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तोपर्यंत 177 विषयांवरील स्थगिती कायम राहणार असून, सत्ताधाऱ्यांना या विषयांवर कोणतीही पुढील कार्यवाही करता येणार नाही.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 नुसार अशा अपीलांवर एका महिन्याच्या आत निर्णय देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निर्णयावर पालिकेच्या पुढील कामकाजाची दिशा तसेच शहरातील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे मानले जात आहे.