आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका, एकतरी मित्र जपा ; कुऱ्हे पानाचे येथे व्याख्यानातून अकोल्याचे कवी अनंत राऊत यांची तरुणाईला साद :

भुसावळ : कविता केवळ प्रश्नांचा भडीमार करते असे नाही तर ती समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचं उत्तरही देते. म्हणून गावागावात कवितेची अभिरूची वाढली आहे. कविता ऐकण्यासाठी अख्खा गाव गोळा होतो हीच शब्दांची ताकद आहे. समाजात खरी क्रांती घडवायची असेल, तर मुलांचा हातातला मोबाईल तुम्ही काढून घ्या. त्यांच्‍या हातात पुस्तक द्या. या जगात आई वडिलांपलीकडे कोणताही देव नाही. त्यामुळे आई – वडिलांचा सांभाळ करा आणि एक तरी मित्र जपा असे आवाहन करीत स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावर, भाषणात बोलून चालणार नाही. ती कृतीतून यावी लागेल असे परखड मत व्यक्त कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केले.

भुसावळ तालुक्यातील जिवलग मित्रांचे गाव कुऱ्हे पानाचे येथे रा. धों. बडगुजर माध्यमिक विद्यालय येथील 1986ची दहावीची बॅच व आई प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गावातील रेणूका देवी मंदिर सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. आयोजकांच्या वतीने कवी राऊत यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रभर हजारो कार्यक्रम केले. पण एवढ्या ताकदीचा सन्मान सोहळा प्रथम अनुभवतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी ‘मायबाप’ कविता सादर करून रसिकांच्या काळजाला हात घातला. ज्याला मायबाप कळले त्याला देव कळले असं सांगत त्यांनी जन्मदात्यांना वृध्दाश्रमात पाठवू नका. ही अनुभवी माणसं संस्कारपीठ आहेत. प्रत्येकाने ती जपावी, असे आवाहन केले.

कवितेतून मांडले समाजवास्तव
‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’ कवितेतून त्यांनी बेगडीपणाचा आव आणणाऱ्या राजकीय मंडळींवर शब्दांचे आसूड ओढले. माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये म्हणून सत्याची बाजू घ्या. तरुणांनो, राजकारण करण्या आधी कामधंदा, व्यवसाय करा. निश्चित शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा असा सल्लाही कवी राऊत यांनी दिला.

काळजाला भिडणाऱ्या कविता
देशभरात शेतकरी गलितगात्र झाला आहे. त्याचा आवाज शासनकर्ती जमात ऐकायला तयार नाही. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे असे सांगून त्यांनी एक कविता सादर केली.

‘बऱ्याच दिवसानंं त्या झोपडीत लखलखाट दिसतोय
शेतकऱ्याचं नशीब फळलं की काय?
दिवाळी न्हाय दसरा न्हाय यानं घरातच प्रेत जाळलं की काय?’

या ओळी काळजाला भिडल्या. त्या ऐकत असताना अनेकांच्या डोळ्यात आसवे आली. समारोप करताना त्यांनी ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ ही कविता पहाडी आवाजात सादर केली. त्यातील

‘जाळताना मला देह ठेवा असा, खांद्यावर हात टाकल्यासारखा’

या ओळी रसिकांना प्रचंड भावल्या. सूत्रसंचालन योगेश गांधेले यांनी केले. प्रस्ताविक निवेदक हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामनेर येथील पंचायत समितीच्या सभापती तथा इयत्ता दहावीच्या १९८६-८७ च्या बॅचच्या उर्मिलाताई पाटील होत्या. यावेळी मंचावर नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई कुलकर्णी, सरपंच कविता उंबरकर, ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर, विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र गांधेले, डॉ. टी. टी. बारी, देशदूतचे मुख्य उपसंपादक संजय सिंग चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर, मुख्याध्यापक एस.पी. चौधरी, एन. एफ. बडगुजर आदी होते. आभार प्रल्हाद रोनखेडे यांनी मानले.