भुसावळ प्रतिनिधी

मानवी शरीराचे कितीही लाड केले तरी अखेरीस ते स्मशानात जाऊन नाश पावणार आहे. त्यामुळे शरीर नश्वर होण्यापूर्वी आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांनी केले. ज्या दिवशी मनुष्य असा प्रयत्न करतो, त्या दिवशी भगवान शिव त्याचा स्वीकार करतात. भगवान शंकर भक्ताचे शरीर, सुंदरता, वस्त्र किंवा आभूषण पाहत नाहीत, तर ते केवळ भक्ती स्वीकारतात. त्यामुळे निस्वार्थ भावनेने भक्ती करावी, असे त्यांनी सांगितले.
पाडळसे येथील अकलूद शिवारात मंगळवारपासून शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली असून तिसऱ्या दिवशी भगवान शंकराच्या महिमेचे वर्णन करताना पं. मिश्रा बोलत होते. विविध पौराणिक कथा सांगत त्यांनी भक्तीमार्गाचे महत्त्व स्पष्ट केले. कथेचे दिवस वाढत आहेत तसे तापमानही वाढत आहे. जणू भगवान शिव भक्तांची परीक्षा घेत आहेत. मात्र ४२ अंश तापमानातही लाखो भाविक भक्तीरसात तल्लीन होऊन कथा श्रवण करत असल्याने भुसावळ परिसरातील शिवभक्तांची अविरत श्रद्धा दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अहंकाराचा त्याग करा
भगवान शंकराकडे धनसंपत्ती मागितली तर ती मिळू शकते; मात्र त्यासोबत अभिमान किंवा अहंकार बाळगू नये. अहंकार माणसाचा नाश करतो. पौराणिक कथांचा दाखला देत अभिमानापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
नामस्मरण हीच त्रिवेणी
प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम मानला जातो. मात्र गळ्यात रुद्राक्ष, डोक्यावर भस्म आणि मुखातून भगवंताचे नामस्मरण हीच खरी त्रिवेणी असल्याचे त्यांनी सांगितले. भक्त जेव्हा शंकराच्या मंदिरात एक लोटा जल अर्पण करतात, तेव्हा त्यांना त्रिवेणी संगमाचे पुण्य प्राप्त होते, असे त्यांनी कथेतून स्पष्ट केले.
वृद्धत्वाचा संदेश
वय वाढल्यानंतर नेत्रांची दृष्टी कमी होणे व श्रवणशक्ती क्षीण होणे यामागेही आध्यात्मिक संदेश असल्याचे सांगताना त्यांनी शिव-पार्वती संवादाचा दाखला दिला. लहान अक्षर दिसेनासे होणे म्हणजे वय वाढल्याची जाणीव; त्यामुळे लहानांच्या चुका माफ कराव्यात. तसेच श्रवणशक्ती कमी होणे म्हणजे व्यर्थ गोष्टी ऐकू नयेत आणि परमात्म्याचे चिंतन करावे, असा संदेश त्यांनी दिला.
भौतिक वस्तू मोठ्या, मन मात्र लहान
आजकाल घरांचे आकार, इमारती, बाथरूम, बाग, पलंग, डायनिंग टेबल सर्व काही मोठे होत आहे; परंतु माणसाचे मन मात्र लहान होत चालले आहे. भौतिक वस्तू मोठ्या झाल्या नाहीत तरी चालेल, पण मन मोठे व्हायला हवे, असेही ते म्हणाले.
परमात्मा मनात शोधा
तीर्थक्षेत्रात जाऊन देव शोधण्यापेक्षा परमात्मा आपल्या मनात आहे हे ओळखावे. आई-वडिलांची सेवा केल्याने देव प्रसन्न होतो. शिवमहापुराण कथा ही सेवा आणि भक्तीचा संदेश देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कथेला तिसऱ्या दिवशीही दीड ते दोन लाख भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवकांनी शिधा पुरविणे, भाजीपाला स्वच्छ करणे, पोळ्या बनविणे, भोजन व पाणी वितरण अशा विविध सेवांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कथास्थळी महिला भाविकांनी भजनांवर ठेका धरत वातावरण भक्तिमय केले. राज्यातील विविध भागांसह मध्यप्रदेश, गुजरात, सुरत आदी ठिकाणांहूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


