भुसावळ (प्रतिनिधी) –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी दिनांक 16 जून 2025 रोजी येथील कृष्णचंद्र सभागृहामध्ये जून 2025 महिन्यातील पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली होती.

वर्षातून दोन वेळा पेन्शनर्सच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पेन्शन अदालत घेतली जाते. यासाठी तीन महिने आधी सूचना देऊन अर्ज मागवले जातात. यावर्षीच्या दुसऱ्या सत्रात एकूण 49 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 2 तक्रारी वेतनविषयक होत्या तर उर्वरित 47 तक्रारी अन्य विषयांशी संबंधित होत्या. पेन्शन अदालतेमध्ये एकूण ₹67,764/- इतकी रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली. तसेच पी.पी.ओ. (PPO) चे पुनरावलोकन व परिवार पेन्शनचे पुनर्नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर मंडल रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमन हे होते. यावेळी लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप आर. खरात यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन मुख्य कार्यालय अधीक्षक उमाकांत बावस्कर यांनी केले.
या प्रसंगी भुसावळ, खंडवा, जळगाव आणि अकोला येथील पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. पेन्शन अदालतेमध्ये अपर मंडल रेल्वे प्रबंधकांनी उपस्थित पेन्शनधारकांना आश्वासन दिले की, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत यासाठी प्राप्त तक्रारी वेळेत सोडवण्यात येतील.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहाय्यक कार्मिक अधिकारी . एस. जे. हिवाळे यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेटलमेंट विभाग, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.



